कोल्हेवाडी खून प्रकरण : चार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात; व्हॉट्सॲप स्टेटसचा राग मनात धरून रचला गेला खुनाचा कट

हवेली : सिंहगड रस्त्यावरील खडकवासला जवळील कोल्हेवाडीत बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) भरदुपारी सव्वाचारच्या सुमारास कोयत्याने वार करून सतीश सुदाम थोपटे (वय ३८ वर्ष, सध्या रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला; मूळ रा. खानापूर थोपटेवाडी, ता. हवेली) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले होते. या घटनेमुळे सिंहगड, खडकवासला परिसरात दहशत पसरली होती.

आरोपींना तात्काळ पकडण्याच्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या सूचना
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना केल्या होत्या, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून गुन्हयाचा समांतर तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. चार अनोळखी व्यक्तींकडून कोयत्याने मारहाण करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.

गोपनीय बातमीदारांची मदत घेऊन आरोपींना खेड शिवापूर परिसरातून केली अटक
त्यानंतर आरोपींची ओळख पटविण्याकरिता गोपनीय बातमीदारांकडे संपर्क केला असता, संशयित आरोपींपैकी एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे नाव देवा लक्ष्मण तांबट (रा. कांजळे, ता. भोर) असे असल्याचे सांगितले. त्याचा शोध घेत असताना चारही संशयित आरोपी हे खेड शिवापूर परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी बातमी स्था.गु.शा.चे पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने ताबडतोब कारवाई करत चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये जिवन ऊर्फ बाळा शैलेश जगताप (वय २७ वर्षे, रा. दत्तवाडी, भंडारी हॉटेलच्या मागे, चोर गल्ली पुणे), अक्षय ऊर्फ बाबु बालाजी शेलार (वय २४ वर्षे, रा. शिवरे, ता. भोर, जि पुणे), सोहेल ऊर्फ फुक्या साजिदअली जोरा, वय १९ वर्षे रा. शिवरे बस स्टैंड शेजारी ता. भोर जि पुणे), देविदास ऊर्फ देवा लक्ष्मण तांबट (वय २० वर्षे, रा. कांजळे, तांबट आळी, ता. भोर, जि पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी भाऊसाहेब सदाशिव किवळे (रा. धायरीफाटा, हवेली, पुणे) यांच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Advertisement

अखेर आरोपींनी उलगडला हत्येचा घटनाक्रम; व्हॉट्सॲप स्टेटसचा राग मनात धरून रचला गेला कट
मयत सतिश थोपटे यांचा भाऊसाहेब सदाशिव किवळे यांच्या सोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. सतिश थोपटे यांनी फ्लॅटवर कर्ज काढून कर्जाची १८ लाख ५० हजार रुपये रक्कम ही भाऊसाहेब किवळे यांना दिली होते. सदरचे कर्ज भाऊसाहेब किवळे हे भरणार असे त्यांचेत ठरले होते, परंतु कर्जाची रक्कम न भरल्याने सतिश थोपटे यांनी पैसे मागण्यास सुरूवात केली. पैसे मिळत नसल्याने सतिश थोपटे यांनी “भाऊसाहेव किवळे याने कर्ज भरले नसुन त्याची कर्ज भरण्याची लायकी नाही” वगैरे मजकुराचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते, त्याचा राग मनात धरून भाऊसाहेब किवळे याने त्याचे चार साथीदारांना पाठवून सतिश सुदाम थोपटे याचा सुशीला पार्क कोल्हेवाडी येथे कोयत्याने वार करून खुन केला आहे. आरोपी भाऊसाहेब किवळे याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, हवेली विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, स्था.गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, पोसई अभिजीत सावंत, अंमलदार हनुमंत पासलकर, रामदास बाबर, राजू मोमीण, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, मंगेश भगत, वैभव सावंत, काशिनाथ राजापुरे, हवेली पो स्टे चे सपोनि सागर पवार, पोसई संजय सुतनासे, अंमलदार विलास प्रधान, राजु मुंढे, संतोष तोडकर, महेद्र चौधरी यांनी केली असून पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करणेत येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page