लाखो भाविकांच्या “काळूबाईच्या नावानं चांगभलं”च्या गजराने दुमदुमला मांढरगड
भोर : महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाई यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३ जानेवारी) उत्साहात झाली.’काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमून गेला.
शाकंभरी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने, सकाळी ६ वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते देवीची आरती व महापूजा झाली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, तहसीलदार सोनाली मेटकरी, विश्वस्त अॅड. माणिक माने, सीए. अतुल दोशी, अॅड. पद्माकर पवार, चंद्रकांत मांढरे, विजय मांढरे, सुनील मांढरे, सुधाकर क्षीरसागर, ओमकार क्षीरसागर, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
भाविक रविवारी रात्रीपासूनच मांढरदेव येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. एसटी, खाजगी बसेस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, दुचाकी आणि इतर खासगी वाहनांनी भाविक मांढरदेव येथे दाखल झाले. रात्री देवीची मानाची पालखी वाजतगाजत काळूबाई मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर देवीचा जागर झाला. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
देवस्थान ट्रस्टने कळस दर्शनरांग, देव्हारा दर्शन रांग व चरणदर्शन रांग अशा वेगवेगळ्या रांगांसाठी बॅरिकेडस् उभारल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ झाले. सोमवारी सकाळी ६ वाजता देवीच्या पायरीजवळील दर्शन रांगेतील प्रथम भाविक प्रदीप प्रभुदयाल मल्होत्रा (मुंबई) आणि त्यांची पत्नी सरिता यांना देवीच्या पूजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेल्या २१ वर्षांपासून देवीच्या दर्शनाला येत आहे. या दाम्पत्याचा देवस्थानच्यावतीने साडीचोळी व देवीचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.
मांढरदेव येथे सकाळी थंडी व धुके असल्याने गर्दीचा ओघ मध्यम होता. मात्र, दुपारी १२ वाजल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दुपारी १ नंतर गर्दीचा ओघ आणखी वाढला. त्यामुळे मंदिर परिसरात काही वेळ गर्दी झाली होती. मात्र, दर्शनासाठी जाण्याचा व माघारी परतण्याचा मार्ग वेगवेगळा असल्याने, गर्दी थांबून राहत नव्हती. दर्शन रांगेतील भाविकाला दोन ते तीन तासांमध्ये सुलभ दर्शन होत होते.
देव्हारा दर्शन रांग व कळस दर्शन रांगेतील भाविकांची संख्या मोठी होती. देवीचे दर्शन झाल्याने भाविक सुखावत होते. दर्शन घेऊन आलेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्यावतीने बुंदीच्या लाडूंचा प्रसाद देण्यात येत होते. दर्शन घेऊन परतणारे भाविक उतरणीच्या मार्गावर थाटलेल्या दुकानांमध्ये देवीचे फोटो, बांगड्या, प्रसाद, पेढे, मुखवटे व इतर वस्तू घेण्यात दंग होते.
मांढरदेव परिसरात अनेक भाविक वाहने लावून देवीसाठी गोडाचा नैवेद्य करताना दिसत होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रशासनातील कर्मचार्यांच्या नाश्त्याची आणि भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. यात्रा शांततेत होण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात होता. यात्रेसाठी एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, २०० कर्मचारी, २५ महिला कर्मचारी, ६० होमगार्ड, वाहतूक नियंत्रण शाखेचे २० कर्मचारी तैनात होते अनिरुद्धबापू डिझास्टर मॅनेजमेंटचे २४० स्वयंसेवक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित होते.त्याचबरोबर महाराष्ट्र कमांडो फोर्सचे ७० कर्मचारीही तैनात होते.
यात्राकाळात भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय विभागाची पथके काळूबाई मंदिर, ग्रामपंचायत व उतरणीच्या मार्गावर कार्यरत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी मांढरदेव येथे तळ ठोकून आहेत. अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर, क्रेन, रुग्णवाहिका मंदिर परिसरात तैनात होत्या.
काळूबाई यात्रेत मांढरदेव येथे पशुहत्या, वाद्य वाजवणे, झाडांना लिंबे, काळ्या बाहुल्या लावणे, करणी करणे, दारू विक्री यावर बंदी आहे. यात्रेत पशुहत्या होऊ नये, म्हणून पोलीस व प्रशासन दक्ष आहे. त्यासाठी वाई-मांढरदेव आणि भोर-मांढरदेव या रस्त्यांवर जागोजागी वाहनांची तपासणी केली जात होती.