खेड शिवापूर टोलनाक्यावर राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाची कारवाई; रंगाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून मद्याची वाहतूक, तब्बल एक कोटीचा माल जप्त
खेड शिवापूर : रंगाच्या डब्याच्या मागे मद्याचे बॉक्स ठेवून त्याची बेकायदा वाहतूक करणारा दहाचाकी कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवड यांनी पकडला. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ सोमवारी (दि. १ जानेवारी) रात्री ही कारवाई करण्यात आली. कंटेनर आणि एक हजारपेक्षा अधिक मद्याचे बॉक्स असा एक कोटी रुपये किमतींचा माल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे.
जप्त केलेले मद्य हे केवळ गोवा राज्यात विकण्याची परवानगी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. कारवाई करून जप्त करण्यात आलेले मद्य हे केवळ गोवा राज्यात विक्री करण्याची परवानगी आहे. मग हे मद्य पुण्यातील खेड-शिवापूर येथे कसे आले? हा माल नक्की कोठे जाणार होता? यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आहे का? अशा सर्व गोष्टींचा तपास आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केला जात आहे.
रंगाचे डबे असलेल्या एका कंटेनरमधून बेकायदा पद्धतीने आणि राज्यात विक्री करण्यास बंदी असलेली मद्याची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने खेड शिवापूर जवळ एक संशयित कंटेनर अडविला. या कंटेनर चालकाकडे चौकशी केली असता, त्याने चुकीची आणि उडवाउडवीची उत्तरे दिली.
राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने कंटेनर ला बाजुला घेत चौकशी करत त्याची तपासणी केली असता. कंटेनरमध्ये रंगाचे डबे होते. या रंगाच्या डब्याच्या पाठीमागे एक हजार पेक्षा अधिक मद्याचे बॉक्स सापडले. या मद्याची विक्री केवळ गोवा राज्यात करता येत असल्याची माहिती समोर आली असून कंटेनर चालकाकडे मद्य वाहतूक करण्याचे लायसन्स नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे, एस .बी. जगदाळे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाचे निरीक्षकांनी ही कारवाई केली.