अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

पुणे : अवघाचा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक!! जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!!, श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. सायंकाळी सातच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा – माऊली – तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला आहे.

प्रस्थान सोहळ्यास आज शनिवारी(दि.२९ जून) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरु झाली. दुपारी दोन वाजता मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. यावेळी पावसाचे आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे सायंकाळी साडेसहा वाजता ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर विना मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. तद्नंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.

Advertisement

तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ – मृदुगाच्या निनादात ‘ज्ञानोबा – तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आंनदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेली महिला वारकरी आणि यामध्ये सहभागी झालेले तरुण वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात वारकरी भजनात अक्षरशः हरवून गेला. सायंकाळी उशिरा हा वैभवी सोहळा भरावरस्तामार्गे, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वारचौकातून दर्शन मंडप इमारतीत पहिल्या मुक्कामासाठी विसावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page