अतिक्रमण हटवण्यासाठी “पीएमआरडीए व एनएचआय”ची जुन्या कात्रज बोगद्या पासून पोलिस बंदोबस्तात सुरुवात; व्यवसायिकांचा मात्र कारवाईस विरोध
खेड शिवापूर : शिंदेवाडी(ता.भोर) येथील जुन्या कात्रज बोगद्याच्या जवळील डंपींग ग्राऊड साठी संपादीत केलेल्या जागेवर काही छोट्या व्यवसाईकांनी उभारलेली शेड व केलेले बांधकामाचे अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडुन पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरु करण्यात आली आहे. परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारे नोटीस न देता कारवाई करण्यात येत असल्याचे सांगुन व्यवसार्ईकांनी या कारवाईस विरोध केला आहे, तर पीएमआरडीए कडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे शेड उभारले गेले असून हे लोक जागेचे मालक नसल्याने त्यांना नोटीस देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा महामार्ग प्राधिकरणाने कारवाई दरम्यान केला आहे.
पुणे सातारा महामार्गावर एनएचआय व पीएमआरडीए यांच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई चालु करण्यात आली आहे. शिंदेवाडी (ता.भोर) येथील जुन्या बोगद्या जवळ दरीत भर टाकुन निर्माण झालेल्या जागेवर अनेक छोटे व्यवसाईकांनी शेड उभारली आहेत, बांधकाम देखिल केली आहेत. हे अनधिकृत असल्याचा दावा करत महामार्ग प्राधिकरणाने गुरुवार (दि. २० मार्च) पासुन तेथील बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे. यास व्यवसाईकांनी विरोध करत नोटीस न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. आमच्याकडे जागेचे खरेदीखत असुन सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद आहे. तसेच बांधकामाची ग्रामपंचायतीकडे नोंद करुन कर भरला जात आहे. विज वितरण कंपनीने आम्हाला विजजोड दिले आहेत, असे असताना आमचे अतिक्रमण कसे अशी भुमिका व्यवसाईकांनी मांडली.
त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले कि, महामार्गाच्या कामासाठी सन १९९७ मध्ये शिंदेवाडी (ता.भोर) येथील जुन्या बोगद्या जवळील गट क्रमांक १२२ ते १३४ असे तेरा गटातील ५.०५ हेक्टर जमिन संपादीत करण्यात आली आहे. या संपादीत जमिनीचा मोबदला बहुतेक सर्व शेतकरयांना देण्यात आला आहे. नविन बोगद्याच्या कामावेळी बोगद्या मधुन निघणारे दगड माती ठेवण्यासाठी डंपिंग ग्राऊड म्हणुन या जागेचा वापर झाला. त्यामुळे येथील मोठी दरी भरली गेली. त्यामुळे त्या सपाट जागेवर हे अतिक्रमण झाले आहे. आमच्याकडे आम्ही संपादीत केलेल्या जागेची मोजणी कागदपत्रे, नकाशा असुन संबधित व्यवसाईकांनी खरेदी केलेली जमिन कोठे आहे, ते त्यांचे त्यांनी पहावे. अशी भुमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. तसेच ही कारवाई चालुच राहणार असून पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज बोगदा ते सारोळा(ता.भोर) पर्यंतची अतिक्रमणे ३० मार्च पर्यंत काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.