कर्तव्यनिष्ठ अधिकारी काळाच्या पडद्याआड; पीएमआरडीएच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे यांचे निधन
पुणे : कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ख्याती मिळविलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे (वय ४८ वर्ष) यांचे आज सोमवार (दि.२४ मार्च) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या सध्या पीएमआरडीएमध्ये जमीन व मालमत्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होत्या. १९९९ मध्ये म्हणजेच वयाच्या २२ व्या वर्षी उपजिल्हाधिकारी संवर्गात पुणे येथे महसूल विभागात त्यांची निवड झाली होती.
त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक यावर त्यांनी कठोर कारवाई केली होती. स्नेहल यांच्या बहीण पल्लवी बर्गे या देखील पोलिस अधिक्षक पदी कार्यरत आहेत. स्नेहल बर्गे या प्रांतधिकारी म्हणून कार्यरत असताना बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण गाजले होते. स्नेहल यांनी त्यावेळी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, वाळवा तसेच हवेली येथील प्रांताधिकारी, महसुल विभागात उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. अपर जिल्हाधिकारी म्हणून त्या पदोन्नतीने पीएमआरडीएमध्ये नियुक्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.