अनोळखी गाडीतून प्रवास करत असाल तर सावधान! पोलिस असल्याचे सांगून पुण्यातील ज्येष्ठ दांपत्याचे प्रवासा दरम्यान तब्बल साडे आठ तोळ्याचे दागिने केले लंपास; राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
खेड शिवापूर : राजस्थान पोलिस असल्याचा भास निर्माण करून अज्ञात चोरट्याने व त्याच्या साथीदाराने पुण्यातील एका वृद्ध दांपत्याला कारमध्ये लिफ्ट देऊन त्यांच्याकडील ४.६२ लाख रुपये किमतीचे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना खेड शिवापूर गावच्या हद्दीत घडली आहे. दागिन्यांमध्ये दोन गंठण, कानातील कुड्या, अंगठीचा समावेश आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहन विष्णू सुतार (वय ७७ रा. बालाजी ग्रीन पार्क, आंबेगाव खुर्द, दरी पुलाजवळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुतार हे सोमवारी सकाळी नातीच्या वाढदिवसाला सातारा येथे जाण्यासाठी कात्रज, मोरे बाग येथे पत्नीसह बसची वाट बघत होते. त्यांच्याशेजारी एक अज्ञात इसम बसला होता. त्याने मी पोलीस असून जयपूरचा (राजस्थान) आहे. सातारा येथे मित्राला भेटायला चाललो आहे असे हिंदीमध्ये त्यांना सांगितले.
त्याच दरम्यान एक गाडी तिथे आली. चालक खाली उतरून अज्ञात इसमाशी हिंदीत बोलला. ते सुतार यांना म्हणाले स्वारगेट येथे एका बाईचा खून झाला आहे. तीचे बावीस तोळे सोने व पैसे गेले आहेत. त्याचा तपास करण्यासाठी आम्ही सातारला चाललो आहोत. चला तुम्हाला सोडतो असे त्यांनी सांगितले. सुतार यांनी प्रवास भाडे किती घेणार विचारल्यावर पन्नास रूपये घेईन असे सांगून आरोपीने त्यांना कारमध्ये बसवले. कात्रज चौकातून जुन्या बोगद्या मार्गे गाडी सातारच्या दिशेने जात असताना, बोगदा पास केल्यावर चालक म्हणाला, मला साहेब ओरडतील, गाडीत पोलीस किंवा आरोपींना बसवण्याची परवानगी आहे. तुम्ही तुमचे दागिने पाकीटात काढून ठेवा. फिर्यादीच्या पत्नीने दागिने चालकाने दिलेल्या पाकीटात ठेवले. पाकिटावर सही करून दागिने परत देतो म्हणून चालकाने पाकीट घेतले.
खेड शिवापूर हद्दीत कार आल्यावर, येथे पोलीस स्टेशनला काम असल्याचे सांगून आम्हाला दोन तास लागतील, तुम्ही तोपर्यंत थांबणार का? असे त्याने सुतार दाम्पत्याला विचारले. सुतार यांनी यावर आम्ही पुढे उतरतो असे सांगितल्यावर चालकाने खेडशिवापूरच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. फिर्यादी उतरल्यावर चालकाने दागिन्याच्या पाकीटा ऐवजी सही केलेले दुसरे पाकीट दिले. फिर्यादी मोहन सुतार यांच्या पत्नीला हा प्रकार लक्षातं येताच त्यांनी आरडा ओरडा केल्यावर चालकाने गाडी जोरात पळवून तेथून पळ काढला. एका दुचाकीला हात करून त्यावरून सुतार यांनी कार चा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी निघून गेल्यामुळे सुतार यांनी खेडशिवापूर पोलीस ठाण्यात झाल्या प्रकाराची माहिती दिली. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.