हुंड्यासाठी विवाहितेला हात पाय बांधून शेततळ्यात बुडवून मारले! बारामतीतील धक्कादायक प्रकार; पती, सासू, नणंदेसह तिच्या पतीलाही अटक
बारामती : नवविवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याबद्दल बारामती तालुक्यातील चौघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती सासू नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेने बारामती तालुक्यात खळबळ उडाली असून वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे(रा.मासाळवाडी), सासु ठकुबाई महादेव गडदरे(रा.मासाळवाडी), नणंद आशा सोनबा कोकरे व तिचा पती सोनबा चंदर कोकरे(दोघेही रा. कुतवळवडी) या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान बिरा गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात नामदेव करगळ यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला. वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात लाल ओढणीने बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील गिरिम येथील नामदेव बबन करगळ(वय ४५ वर्षे) यांनी पोलिसांकडे दिली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लवटे करीत आहेत.