भाटघर धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने जुन्या “लेक व्हायटिंग” धरणाचे दर्शन
भोर : भाटघर धारणाची पाणी पातळी घटल्यामुळे धरण बांधण्याअगोदर धरणाच्या आतील बाजूस बांधलेले ‘लेक व्हायटिंग धरण’ आता दिसू लागले आहे. धरणात २९ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने लेक व्हायटिंग धरण पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. परंतु, भाटघर धरणाच्या उत्तर व दक्षिण बाजूस असणाऱ्या दोन्ही गेटमधून प्रवेश बंदी असल्याने पर्यटकांना बॅकवॉटरच्या लांब पल्ल्यावरून लेक व्हायटिंग धरण पाहावे लागत आहे.
१३३ वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या उद्देशाने व पूर्वेकडील शेती सिंचनासाठी लेक व्हायटिंग धरण बांधण्यात आले होते. याचा शुभारंभ सन १८८१ मध्ये इंग्रज राजवटीत उत्तर बाजूस संगमनेर (ता. भोर) गावच्या हद्दीपासून ते दक्षिण बाजूस भाटघर (ता. खंडाळा) गावच्या हद्दीपर्यंत १८ मीटर उंचीची भिंत बांधण्यास सुरुवात झाली होती. ११ वर्षांनी म्हणजे १८९२ साली भिंतीचे काम पूर्ण झालेल्या या धरणाला लेक व्हायटिंग असे नाव देण्यात आले.
लेक व्हायटिंग धरणात ५.२० टीएमसी एवढा पाणीसाठा साठू लागला. परंतु, हा धरणातील पाणी साठा कमी पडू लागल्याने मोठे धरण बांधण्याच्या उद्देशाने धरणाच्या भिंतीलगत पूर्वेला ५७.९१ मीटर उंचीची भिंत बांधण्यात आली. या धरणाचे काम १९२७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर या धरणाला ‘भाटघर धरण’ (येसाजी कंक जलाशय) असे नाव देण्यात आले. या भाटघर धरणात २३.७४ एवढा पाणीसाठा साठू लागला.
भाटघर धरणाची भिंत ५७.९१ मीटर उंचीची आहे, तर लेक व्हायटिंग धरणाची भिंत १८ मीटर उंचीची आहे. भाटघर धरणाची भिंत लेक व्हायटिंग धरणाच्या भिंतीपेक्षा ३९.९१ मीटर उंच आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी लेक व्हायटिंग धरणाच्या भिंतीच्या वर गेल्यानंतर लेक व्हायटिंग धरण दिसेनासे होते. मात्र, दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात भाटघरच्या पाण्याची पातळी ५.२० टीएमसीपेक्षा कमी झाल्यानंतर लेक व्हायटिंग धरण दिसू लागते.