पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात रांझेतील युवकाचा मृत्यू
खेड-शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीत शुक्रवारी(दि. २४ मे) रात्री पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश बाळासाहेब धोत्रे(वय २९ वर्ष, रा, रांझे, ता, भोर) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत रूपेश हनुमंत निंबाळकर(वय २६ वर्ष, सध्या रा. मंहमदवाडी कृष्णा नगर, हडपसर, पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी(दि. २४ मे) पहाटे वेळू गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात योगेश धोत्रे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. अज्ञात वाहन चालक हा भरधाव वाहन चालवून योगेशच्या मृत्यूस जबाबदार असल्याची फिर्याद रुपेश निंबाळकर यांनी दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण करीत आहेत.