उपसरपंच यादवांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर; कांबरेत सरपंच व सदस्यांची एकी
नसरापूर : कांबरे खे.बा. (ता. भोर) ग्रामपंचाययीच्या उपसरपंच पार्वती कैलास यादव यांच्या विरूद्ध सदस्य व सरपंचांनी आणलेला अविश्वास ठराव पाच विरूद्ध एक मताने मंजुर करण्यात आला. उपसरपंच पार्वती कैलास यादव या इतर सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करतात, कामकाजात पती व अन्य नातेवाईकांचा हस्तक्षेत होत असतो, त्या पदाचा गैरवापर करतात, विचारणा केली असता अरेरावीची भाषा करतात आदी तक्रार करून गावचे सरपंच व सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.
या ठरावावर चर्चा व मतदान करण्यासाठी भोरचे तहसलिदार राजेद्र नजन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली. येथे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात व एक लोकनियुक्त सरपंच, अशी आहे. यामधील एक सदस्याचे निधन झाले आहे, तर एक सदस्य अपात्र आहे.
अविश्वासाच्या सभेला सरपंच सागर शिंदे, उपसरपंच पार्वती यादव, सदस्य दशरथ मांढरे, नंदा निगडे, प्राची महांगरे, संगिता कोंढाळकर, हे सदस्य उपस्थित होते. सदस्यांनी केलेले आरोप उपसरपंच पार्वती यादव यांनी फेटाळले. त्यानंतर अविश्वास ठरावाबाबत सदस्यांचे हात वर करुन मतदान घेण्यात आले. यात ठरावाच्या बाजुने सरपंच सागर शिंदे, सदस्य दशरथ मांढरे, संगिता कोंढाळकर, निंदा निगडे, प्राची महांगरे या पाच जणांनी मतदान केले, तर ठरावच्या विरोधात स्वतः उपसरपंच यादव यांचे एक मत मिळाले. त्यामुळे अविश्वास ठराव पाच विरुध्द एक मताने मंजुर झाल्याचे सभेचे अध्यक्ष तहसीलदार राजेंद्र नजन यांनी जाहीर केले. यावेळी ग्राम अधिकारी स्वाती महांगरे, नसरापूरचे मंडलाधिकारी प्रदिपकुमार जावळे, तलाठी प्रविण गरुड उपस्थित होते.