हडपसरला बंगला, बाणेर- वानवडीत ऑफिस, महागड्या कार… खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर कोण?
पुणे : शहरातील खराडी भागात सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई या पार्टीत सामिल असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला असून, २ महिला आणि ५ पुरुषांना अटक केली आहे. या प्रकरणात रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरही पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. हा प्रांजल खेवलकर कोण आहे? त्याची रोहिणी खडसेंशी ओळख कशी झाली? त्याचे व्यवसाय काय? हे जाणून घेऊया..
कोण आहे प्रांजल खेवलकर?
प्रांजलने खेवलकरने पुण्यातील भारती विद्यापीठमधून डॉक्टर ऑफ मेडिसिनचे (एम.डी) शिक्षण घेतले आहे. प्रांजल हा मूळचा जळगावचा आहे. रोहिणी खडसे व प्रांजल खेवलकर यांचे लग्न १४ फेब्रुवारी २०१३ रोजी झाले असून व्हॅलेंटाईनच्या दिवशी बालपणाचे हे मित्र विवाह बंधनात बांधले गेले. दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. ३० जून रोजी प्रांजलचा वाढदिवस असतो. रोहिणी या पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहे. रोहिणी- प्रांजल दाम्पत्याला जुळी मुलं आहेत. सारा आणि समरजित अशी या मुलांची नावे आहेत.
प्रांजल खेवलकरची संपत्ती किती?
रोहिणी खडसे यांनी २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी- शरद पवार पक्षाकडून मुक्ताईनगरमधून उमेदवारी अर्ज भरला होता. यात खेवलकरच्या आयकर विवरणपत्रात दर्शवलेल्या उत्पन्नाची माहिती आहे. यानुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षांत खेवलकरचे आर्थिक उत्पन्न ३६ लाख ६३ हजार रुपये होते. तर २०२३-२४ या वर्षात त्याचे उत्पन्न ५२ लाख रुपये इतके होते.
खेवलकरकडे बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि जीप मेरिडीयन अशा तीन चारचाकी आहेत. याशिवाई मुक्तानगरमधील मौजे कोथळीत शेतजमीन, पुण्यातील बाणेरमध्ये वाणिज्य संकुलातील नवव्या मजल्यावर कार्यालय, वानवडीत एक दुकान आणि कार्यालये आहेत. तसेच हडपसर येथे बंगला असून नाशिक- मुक्ताईनगर येथे देखील निवासी जागा आहेत. प्रांजलवर कोट्यवधींचे कर्ज देखील आहे.
प्रांजल खेवलकरचे व्यवसाय काय?
प्रांजलच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर उद्योजक, डॉक्टर आणि निर्माता असा उल्लेख आहे. रोहिणी खडसेंच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रांजलचा गॅस एजन्सीत त्यांचा २० टक्के हिस्सा देखील आहे. याशिवाय समर प्रॉडक्शन अशी कंपनी देखील असून याद्वारे प्रांजलने काही म्यूझिक व्हिडिओची निर्मितीदेखील केली आहे. प्रांजल हा समाजकार्याशीही जोडलेला असून त्याची एक समाजसेवी संस्था देखील आहे. याशिवाय इव्हा योगा, एपी इव्हेंट्स अँड मीडिया या कंपन्यांचा तो संस्थापक आहेत. रिअल इस्टेट, ऊर्जा अशा विविध क्षेत्रात तो कार्यरत आहे.
प्रांजल खेवलकर यापूर्वी कधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता?
२०१६ मध्ये अंजली दमानिया यांनी लिमोझीन कारवरून प्रांजल खेवलकरवर आरोप केले होते. ही लिमोझीन कार २६ नोव्हेंबर २००१ रोजी ठाणे आरटीओमध्ये नोंदणीकृत होती. या कारचा मूळ मालक हा अंधेरीतील व्यावसायिक होता. त्याने २५ लाख रुपये खर्च करून हुंदाई सोनाटाचे बेकायदेशीरपणे लिमोझिनमध्ये रूपांतर केले होते. ही कार नंतर प्रांजलच्या नावावर होती. “माझ्या मुलीचे लग्न त्यांच्याशी २०१३ मध्ये झाले, त्यामुळे २०१३ पूर्वी खेवलकर यांनी जे काही केले त्यासाठी मला कसे जबाबदार धरले जाऊ शकते?”, असे प्रत्युत्तर त्यावेळी खडसेंनी दिले होते.
पुढे काय होणार?
सध्या राजकारणात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे या सक्रिय राजकारणात आहेत. दोघेही सातत्याने विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेत सरकाराला जाब विचारत असतात. या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता पुढे काय समोर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.