अजित पवारांचे भाषण सुरू असताना विजय शिवतारे हे कुलदीप कोंडेंना व्यासपीठावर घेऊन आले……काय बोलले अजित पवार?
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी आज पुण्यात सभा झाली. आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकाच व्यासपीठावर होते. या वेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे कुलदीप कोंडेंना व्यासपीठावर घेऊन आले. ते उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंच्या सेनेत येत असल्याचे समजताच अजितदादा म्हणाले, जे लाखाने मतं घेतात ते कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भोर, वेल्हा, मुळशीमध्ये त्यांची किती ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ही किमया विजय शिवतारेंनी केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
विरोधक कसा असावा लागतो, हे यांच्याकडे बघून शिका. मित्रही कसा असावा लागतो, तेही विजयबापूंकडे बघून शिका. एकदा मैत्री केली की, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडू देत नाही. अशापद्धतीचे काम विजय शिवतारेंचे असल्याचे कौतुक अजित पवारांनी केले.
शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली होती. पण नंतर त्यांनी माघार घेत सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सुरू केला. सासवडमध्ये त्यांनी त्यासाठी सभाही घेतली. त्यानंतर आज कोंडे यांना पक्षात आणत त्यांनी दादांना मोठा दिलासा दिला आहे. कोंडे यांनी भोर विधानसभा मतदारसंघात दोनदा निवडणूक लढली आहे. त्यांना मिळालेली मतेही लक्षणीय होती.
भाषणादरम्यान अजितदादा म्हणाले, आपली आता चांगल्या पद्धतीने युती झाली आहे. त्याला कुठेही दृष्ट लागू द्यायचे काम करायचे नाही. विजय शिवतारेंमुळे पुरंदर आणि हवेली मतदारसंघांत ताकद वाढली आहे. भोर-वेल्हामध्ये कुलदीप कोंडेंमुळे आपली ताकद वाढली आहे. त्यांनाही तसाच मानसन्मान महायुतीकडून मिळेल, असा शब्द मी कोंडेंना देतो.