मंतरलेल्या दिवसांच्या स्मृति जपणारा “न्यु इंग्लिश स्कूल, न्हावी”चा स्नेहमेळावा
सारोळे : शाळेतल्या बाईंना आणि सरांना भेटण्याची उत्सुकता, आपल्या सवंगड्यांना शोधणाऱ्या नजरा, कॉलेजमधल्या मंतरलेल्या दिवसांची आठवण, मित्र-मैत्रिणींच्या साक्षीनं अनुभवलेले संवेदनशील क्षण, कट्ट्यावर केलेला कल्ला, उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा डोंगर, मनात दाटून येणाऱ्या आठवणी, जीवनाच्या प्रवासात स्थिरावल्यानंतर ‘बॅचमेट’ना भेटण्याची उत्सुकता अशा उत्साहवर्धक वातावरणात “न्यु इंग्लिश स्कूल न्हावी” येथे इयत्ता दहावी, २०००-०१ बॅचच्या माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा तब्बल २३ वर्षांनंतर मंगळवारी(दि. २० फेब्रुवारी) रंगला!
प्रथमतः सर्वजण एकत्र आल्यावर सर्वांना फेटे बांधण्यात आले. त्यांनतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. “शिक्षण घेत असताना शिक्षकांनी ज्ञानदान करून ज्ञानरूपी दिवा आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये लावला त्यांच्या मार्गदर्शनामुळे व मिळालेल्या चांगले शिक्षण आणि संस्कारामुळे आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही विद्यार्थी यशाच्या शिखरावर विराजमान आहोत.” अशी भावना या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शालेय जीवनामध्ये मार्गदर्शन केलेले चव्हाण सर, भुतकर सर, तारू सर, वालगुडे सर, कांबळे सर, सणस सर, तसेच लेखनिक भोसले सर, देसाई सर यांना निमंत्रित करून या प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शिक्षक-विद्यार्थ्यांमधल्या स्नेहसंवादाने प्रत्येकाच्या मनातल्या जुन्या आठवणींचा कोपरा आपोआप उघडला गेला.
तब्बल २३ वर्षांनी आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला आवर्जून बोलावून जो मान दिला याबद्दल शिक्षकही भारावून गेले. याशिवाय २३ वर्षानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळून यापुढील जीवनामध्ये एक चांगल्या सकारात्मक विचाराने स्नेहबंध अतूट ठेवत एकमेकांना कायम मदतीचा हात देण्याचा निर्णय या सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये घेतला. त्यानंतर सर्वांनी परिचय करून दिला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व कौटुंबिक माहिती देऊन आपण आज काय करत आहोत याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास ४२ विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्यतः माजी विद्यार्थी नवनाथ सोनवणे(चेअरमन न्हावी, वि.का.से.सो.लि.), शैलेंद्र जगताप(अध्यक्ष, पुणे जि. ऊस वाहतूक संघटना), युवराज सोनवणे(उद्योजक), अतुल जगताप(सीनियर मॅनेजर पुना ट्रॅव्हल्स) यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर वातावरणात संपन्न होऊन या स्नेहमेळाव्याची सांगता सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. आपल्या जीवनाला दिशा देणारे मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शाळा यांच्याबद्दल ऋतज्ञता व्यक्त करत प्रत्येक जणाने या स्नेहमेळाव्याच्या आठवणी मनात साठवल्या.