गावच्या रस्त्यावर खड्डे, नेत्यांच्या गप्पा आभाळात! देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांच्या गावचाच रस्ता खड्ड्यात
मुख्य संपादक : दिपक महांगरे
नसरापूर : भोर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच राजकारण चांगलेच तापले आहे. आखाडपार्टी झाल्या, उद्घाटने, विविध कार्यक्रम आणि व्याख्यानांच्या माध्यमातून काही इच्छुक उमेदवार जनतेत पोहोचण्याचा आटापिटा करत आहेत. जनतेनेच या काही “नेतेगणांच्या” ढोंगी विकासावर बोचरी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
काही इच्छूक उमेदवार तर देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु हे स्वप्न पाहणाऱ्यांना स्वतःच्या गावाचा रस्ता कधी नीट करायचा हे माहीत नाही!” अशी संतप्त प्रतिक्रिया खुद्द त्या स्वयंघोषित नेत्यांच्या गावकऱ्यांनी दिली आहे. गेली कित्येक महिने गावात जाणारा रस्ता खड्ड्यात गेला आहे. हा रस्ता अक्षरशः धोकादायक बनला असून येथील खड्डे पावसात जलाशयासारखे भरतात. दुचाकीस्वार पडतात, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर अडकतात, विद्यार्थ्यांना आणि महिलांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतो.
विकासाच्या गप्पा मारणारे हे स्वयंघोषित नेते या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट सांगितले. एकदा याच गावातील एका आजारी महिलेला नसरापूर दवाखान्यातून परतताना रिक्षा करावी लागली, पण रिक्षावाल्याने सरळ नकार दिला, तो म्हणाला “कुठेही येईन, पण तुमच्या गावात नाही! रस्ताच असा आहे की रिक्षा घेऊन येणं शक्यच नाही.” अशी अनेक उदाहरणे ग्रामस्थ देत आहेत.
इतकंच नव्हे तर, काही महिन्यांपूर्वी या नेत्यांच्या गावात आणि लगतच्या भागात गंभीर पाणीटंचाई असतानाही हे “स्वयंघोषित विकासपुरुष” तेव्हा कुठेच दिसले नाहीत! अशी सडेतोड तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. “गावच संभाळत नाही, आणि देश घडवायला निघालाय? आधी स्वतःचं अंगण साफ कर, मग दिल्लीची स्वप्नं पाह!” अशी तिखट प्रतिक्रिया गावकऱ्यांनी फेकली आहे. आगामी निवडणुकांसाठी भोर तालुक्यात नेत्यांच्या भाषणांचे ढोल तर जोरात वाजत आहेत, पण जनतेची नजर आता अधिक धारधार झाल्याने अनेकांचा कस मात्र नक्कीच लागणार आहे.