जप्त मुद्देमाल वाहन विक्री प्रकरणी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
पुणे : लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी काढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलीस चौकी हे स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन झाल्यानंतर बिनधनी वाहने, चोरीची वाहने, गुन्ह्यातील, अपघातातील, विना नंबरची वाहने ही लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे स्थलांतरीत करायची होती. ही वाहने ठेवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला वनविभागाकडून जागा देण्यात आली आहे.
ही वाहने स्थलांतरीत करण्याचे काम बाळासाहेब घाडगे उर्फ बाळू (झिरो पोलीस) याने केले. या दरम्यान बाळूने यातील काही वाहने त्यात दुचाकी वाहन बाजारात विकल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले असल्याची कबुली त्याने दिली. त्यात त्याने वरील चार पोलीस कर्मचाऱ्यांची नावे सांगितली. त्यामुळे या प्रकरणात या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी वारंवार बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.