भोर तालुक्यातील सारोळा येथे दुमदुमला दुर्गामाता दौडचा आवाज…
सारोळा : महाराष्ट्रामधील अनेक तालुक्यातील गावात नवरात्री उत्सवा निमित्त दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. दुर्गामाता दौड मध्ये मोठ्या प्रमाणावर बालयुवक,तरुण,पुरुष,स्त्रिया हे सहभागी होताना दिसत आहेत.
श्री दुर्गामाता दौड म्हणजे फक्त देवीची उपासना नाही तर ती भारतमातेची उपासना आहे.आत्मोन्नती,आत्मोद्धार,आत्मसाक्षात्कारातुन राष्ट्रोन्नती,राष्ट्रोद्धार राष्ट्रसाक्षात्काराकडे घेवुन जाणारा तो मार्ग आहे…श्री शिवछत्रपती धर्मवीर शंभुमहाराज यांच्या पाऊलावर पाय ठेवुन चालण्याचा देशभक्ती धर्मभक्ती स्वातंत्र्यभक्तीचा भगव्या ध्वजाच्या हिंदवी स्वराज्याचा तो मार्ग आहे…दुर्गामाता दौड म्हणजे जाती पातीत विखुरलेल्या हिंदुंना हिंदवी स्वराज्य व्रताची दिक्षा देणारा राष्ट्रजागरणाचा तो मार्ग आहे. असे धरकऱ्यांचे म्हणणे आहे.
सारोळा(ता.भोर) येथे मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौडीचे आयोजन केले होते. दुर्गामाता दौडीचे हे दुसरे वर्ष आहे.आठव्या दिवशी रविवार (दि.२०) काढलेल्या दुर्गामाता दौडीतून देव, देश, धर्माचा जागर पाहावयास मिळाला. प्रथमता छत्रपती शिवाजी चौकातील शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन महिला भगिनी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रेरनामंत्र सादर करून श्री दुर्गामाता दौड सुरुवात झाली. ही दौड छत्रपती शिवस्मारकापासून पुढे जय मातादी चौकाकडे मार्गस्थ झाली. यावेळी जय मातादि चौकात धारकऱ्यांनी आरती घेऊन परिसरातील भाविकांनी स्वागत केले.पुढे दौंड शिवशंभू चौकामध्ये आली तिथेही भाविकांनी स्वागत केले सर्व परिसर शिवजय घोषाने दुमदुमून गेला होता. बालचमूकल्यासह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अनेक भागात दौडीमध्ये धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दौडीच्या मार्गावर महिलांनी धारकऱ्यांचे औक्षण करून दौडीचे स्वागत केले. दुर्गा देवी व धर्म रक्षणाच्या स्फूर्ती गीतांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. दौडीच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. दौडीच्या मार्गावरती पुष्पवृष्टी करण्यात आली होती.अखिल सारोळे गाव व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सारोळे विभाग यांनी हा कार्यक्रम पार पाडला.