सावधान! वीसगाव खोऱ्यात उष्माघाताने तब्बल ५०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू
भोर : वीसगाव खोऱ्यात उष्माघाताने चार-पाच पोल्ट्रीतील ५०० हून अधिक बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून दूषित वातावरणात होऊन ढगाळ हवामान तयार झाले आहे. उकाडा मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. याचा परिणाम होऊन पोल्ट्रीतील बॉयलर कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. खानापूर (ता. भोर) येथील पोल्ट्री व्यावसायिक नवनाथ तनपुरे- १५०, पंकज थोपटे-१०५, पिंटू थोपटे-५०, कृष्णा थोपटे-१९० तसेच अंबाडे येथील विजय खोपडे यांच्या पोल्ट्रीतील ३० अशा एकूण ५२५, तर गणेश थोपटे यांच्या गावरान ५० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
दरम्यान, उष्णता वाढत असून, वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने फॅन, स्प्रिंकल, स्पोगर बंद पडत असल्याने आणखी कोंबड्यांचा मृत्यू होण्याची भीती खानापूर येथील नवनाथ तनपुरे यांनी सांगितले.