शासकीय अधिकारी असावा तर असा !कक्षा बाहेर चक्क ‘मी माझ्या पगारात समाधानी आहे’ असा फलक लावला…
सातारा : शासकीय अधिकारी म्हटलं की त्यांच्या मागेपुढे करण्याबरोबरच कागद टेबलावरून हलविण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात. ही गोष्ट लक्षात घेऊन सातारा गटविकास अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या सतीश बुद्धे यांनी चक्क आपल्या कक्षाबाहेर ‘मी माझ्या पगारात समाधानी आहे’ हा फलक लावला आहे. कामानिमित्ताने पंचायत समितीत येणाऱ्या सर्वांचेच लक्ष हा फलक वेधून घेत आहे.
सतीश बुद्धे यांनी काही दिवस झाले साताऱ्यात गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारला. सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बुद्धे यांनी लावलेल्या या फलकामुळे अनेक लोकांचे धाबे दणाणले आहेत.
आपल्या नावाखाली कोणीही गैरप्रकार करू नये असा स्पष्ट निरोपही बुद्धे यांनी याद्वारे दिला आहे. लोकसेवक म्हणून नोकरी करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा असून अधिक माया जमविण्याची माझी इच्छा नाही. जे काम कायद्याच्या चौकटीत बसत असेल ते काम होणारच असेही त्यांनी या वेळेस सांगितले.या फलकाने पंचायत समितीतील अवघे वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे कागदावर वजन ठेवल्याशिवाय ज्यांच्या टेबलावरून कागदे हालत नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांची यामुळे गोची झाली आहे.
समितीत नव्याने रूजु झालेले गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी आपल्या दालनाबाहेर एक बोर्ड लावला आहे. लक्षवेधक ठरलेल्या या बोर्डावर ठळकपणे मजकुर लिहीला आहे. यात ‘मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर निवेदने, तक्रारी, लेखी स्वरूपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर व्हॉटसॲप मेसेज नाव व गावाच्या उल्लेखासह) करावा’ असे नमुद करण्यात आले आहे. परिसरात गटविकास अधिकारी म्हणून नव्याने कार्यरत झालेल्या सतिश बुद्धेंचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. ‘शासकीय अधिकारी असावा तर asa’ असे सगळीकडे बोलले जात आहे.