भोर तालुक्यातील निगडे येथील सकल मराठा समाजाचा मतदानावर बहिष्कार…राजकीय सर्वपक्षीय नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंद…
भोर : पुणे सातारा महामार्गावरील निगडे ता. भोर येथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे. तालुक्यातील पहिलेच गाव असून पंचक्रोशीत या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. येथून पुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फिरू देणार नसल्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
निगडे ता. भोर सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी असून त्यांच्या भूमिकेला आम्ही शेवटपर्यंत समर्थन देणार आहोत. आम्ही मराठा आरक्षणासाठी काहीही करायला तयार असल्याचे मत मराठा समाजाच्या युवकांतर्फे यावेळी व्यक्त करण्यात आले.
निगडे गावातील सकल मराठा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकला असून आम्ही भोर तालुक्यातील सर्व सकल समाज मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन करणार आहोत. आमच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या असून, येथून पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी या आरक्षणाच्या लढाईत आम्ही सर्वांबरोबर असणार व मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढवण्यासाठी सज्ज आहोत
आम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारे असून मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न जर राजकीय मंडळी करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार असा मोठा फलक एसटी बस स्थानकासमोर लावण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित होते.