महागड्या सायकल चोरी करणारे जोडपे सिंहगड पोलिसांच्या ताब्यात
पुणे : सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगरमध्ये ६ ऑगस्ट रोजी चोरीची घटना घडली होती. त्यानुसार सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.२६ ऑक्टोबर रोजी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम आणि तपास पथकाने वडगाव पुलाजवळ गस्त घालत असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक व्यक्ती पुढे आणि पाठीमागे बसलेली एक महिला, सायकल घेऊन जात असल्याचे दिसले. चौकशी केली असता, संशयितांनी विजय पाठक आणि डायना डिसोझा अशी ओळख दिली.संशयास्पदरीत्या वागणुकीमुळे पोलिसांनी सायकलची चौकशी केली. त्यांच्या अस्पष्ट आणि असमाधानकारक उत्तरांमुळे पोलिसांचा संशय बळावला. हे जोडपे जलद पैसे कमावण्यासाठी महागड्या सायकली चोरत असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली.
सिंहगड रोड पोलिसांनी विजय राजेंद्र पाठक (वय ३६ वर्षे) आणि डायना डेन्झिल डिसोझा (वय २५ वर्षे) अशी दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ३,५०,००० रुपये किमतीच्या एकूण १४ उच्च किंमतीच्या सायकली जप्त करण्यात आल्या.तपासात तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित दुचाकींबाबत तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.