रायगडला जाण्यासाठी भोर, पुण्यातून नवा मार्ग मंजूर
भोर : वेल्हे तालुक्यातील नवीन रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रायगडला जोडणारा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधी, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५ कोटी रुपये असा एकूण ३० कोटी ३२ लाख रु. निधी मंजूर झाला आहे. सदर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच काम सुरू होईल. वेल्हे ते मढेघाट मार्ग खडतर, सुरुवातीला या रस्त्यासाठी वेल्हे ते मढेघाट हा मार्ग निवडण्यात आला होता. त्याचे सर्वेक्षणदेखील झाले होते. मात्र, अतितीव्र चढ-उतार, नागमोडी वळणे, खडक व टेकड्यांचा भूभाग असल्याने नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल होती. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या काम करणे अतिशय खडतर होते. एवढेच नाही, तर भविष्यात वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक, त्रासदायक होऊ शकतो, असेही समोर आले होते.
यामुळे नव्याने भोरडी, पिशवी, गुगुळशी, पांगारी ते शेवते (रायगड) हा पर्यायी रस्ता आमदार संग्राम थोपटे यांनी सुचविला. संबंधित विभागाने त्याची पाहणी करून अहवाल राज्य सरकारकडे पाठविला. त्यानुसार १३ किलोमीटरच्या या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले.