वाई वनविभाग व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या कारवाईत सराईत गुन्हेगाराकडून ६,२०,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
वाई : रविवार (दि.२९ ऑक्टोबर) रोजी अरुण देवकर(पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा)यांना, बावधन नाका,वाई येथील अविनाश मोहन पिसाळ (रा. बावधन नाका ता. वाई जि. सातारा) याच्याकडे बेकायदेशिर देशी बनावटीचे पिस्टल आहे तसेच त्यास शिकारीचा छंद असून त्याच्याकडे वन्यजीव प्राण्यांचे अवयवही आहेत अशी खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.
अरुण देवकर यांनी लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रवींद्र भोरे यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता वनविभाग वाई येथील अधिकारी यांना सोबत घेवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा टाकला. तिथे त्यांना ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे.७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळया, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा एकूण ६,२०,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळला. त्यांनी तो जप्त करून शस्त्र अधिनियम कलम ३,४,२५ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५०,५१ अन्वये वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.