राजगड सहकारी साखर कारखान्यास ऊस तोडणी कामगार पुरवण्याच्या बहाण्याने तब्बल २४ लाखांची फसवणूक; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कापूरहोळ : साखर कारखान्यास ऊसतोड कामगार व वाहन पुरवतो म्हणून उचल घेऊन २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत राजगड सहकारी साखर कारखाना लि.(अनंतनगर, निगडे. ता भोर. जि पुणे) यांच्याकडून ५ जणांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याचे शेती अधिकारी विश्वनाथ विष्णु यादव(वय ५४ वर्ष, रा. देगाव, ता. भोर) यांनी याबाबत आज गुरुवारी(१ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनंतर आण्णासाहेब गुलाबराव बोडखे (रा. देभेगाव. ता कन्नड. जि औरंगाबाद), बंडु शिवाजी पवार (वय ४६ वर्ष. रा लेंडेवाडी तांडा, ता परळी. जि बीड), अशोक भारकर गडदे (वय ३८ वर्ष. रा येल्डा. ता अंबोजोगाई. जि बीड), भगवान रामकृष्ण निगुट (वय २९ वर्ष. रा चिकटगाव, ता वैजापुर. जि औरंगाबाद), रवींद्र रावसाहेब पाटोळे (वय ४३ वर्ष. रा देवपिंपरी. ता गेवराई. जि बीड) या पाच संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णासाहेब बोडखे व वरील ४ ठेकेदारांनी राजगड कारखान्यास ऊस तोडणी मजूर आणि वाहने पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्यापोटी त्यांनी कारखान्याकडून सुमारे २४ लाख रुपये उचल घेतली. परंतु सदरचे ठेकेदार हे गळीत हंगामाकरीता उस तोड टोळी घेउन आले नाहीत. त्यानंतर कारखाना प्रशासनाने वरील संबंधितांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सहकारी साखर कारखाना प्रतीनीधी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कारखाना प्रशासनाने वरील ठेकेदारांना वेळोवेळी रितसर ॲडव्हान्स वसुली बाबत कार्यकारी संचालक यांच्या सहीने संबंधितांना नोटीस पाठवली होती. परंतु ते ८ डिसेंबर २०२३ ते आज गुरुवार (१ फेब्रुवारी २०२४) रोजी पर्यंत उस तोडणीसाठी आले नाहीत आणि कारखाण्याचे पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपआपसात संगनमत करून कारखाण्याकडून ॲडव्हान्स म्हणून उचल घेतलेली एकूण २४ लाख रूपये रक्कम घेउन कारखाण्याच्या गळीत हंगामावेळी उस तोडनी वाहतुकीसाठी कामगार व वाहन न देता स्वताच्या फायदयासाठी संगनमताने अपहार करून कारखाण्याची आर्थिक फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे, सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक अजित पाटील करीत आहेत.