जुगार खेळवून फसवणूक करणारी टोळी आनेवाडी टोल नाक्यावर जेरबंद,सात जण ताब्यात
भुईंज : आनेवाडी टोलनाच्या हद्दीत जावळी गावच्या बाजूला पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काही वाहन चालकांना तीन पानी जुगार खेळून त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यावर भुईंज पोलीस स्टेशनचे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी छापा मारून रात्री सव्वा एकच्या दरम्यान ही कारवाई केली. त्यामधे काही व्यक्ती हायवे रोडच्या कडेला टेबल लावून बॅटरीच्या प्रकाशात वाहन चालकांना थांबवून तीन पानी नावाचा जुगार खेळवत होते. पोलिसांनी संबंधितांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून दहा हजार रुपयाची रोख रक्कम, पांढऱ्या रंगाची मारुती कार, एक्टिवा मोटरसायकल, आठ मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य असा ४ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईंजचे पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, राजाराम माने, रविराज वरळीकर, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, राजेश कांबळे, सुहास कांबळे यांनी ही कारवाई केली.