कातकरी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ द्या- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख.
भोर, वेल्हा व मुळशीतील ६८ गावांत योजना राबवली जाणार
पुणे : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. जनमन योजनेचा आढावा घेण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
डॉ.देशमुख म्हणाले, केंद्र शासन स्तरावरून जनमन योजनेचे संनियंत्रण होत आहे. यामुळे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियेाजन करावे. कातकरी समाजाला वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन करावे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला सर्व योजनांचा लाभ मिळेल असे सुनिश्चित करावे. पात्र व्यक्ती लाभाशिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आवश्यक बाबींची पुर्तता करावी, असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी आणि उज्वला गॅस जोडणीबाबत सूचना दिल्या. यावेळी श्रीमती आखाडे आणि श्रीमती कडू यांनीदेखील योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
आंबेगाव तालुक्यात २६, भोर ३०, मावळ ९१, मुळशी २७, जुन्नर ८, खेड ३४ आणि वेल्हे तालुक्यात ११ गावे अशा एकूण २२६ गावात ही योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला खेड, जुन्नर, आंबेगाव आणि भोरचे उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते.