माउलींचे मानाचे अश्व निघाले पुण्याकडे; २८ जून रोजी आळंदीला पोचणार
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीसाठी जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली (कर्नाटक) येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले. टाळ-मृदंगाचा निनाद अन् माउलीनामाचा गजरात या अश्वांना अंकलीकरांनी निरोप दिला. हे अश्व तब्बल अकरा दिवसांचा प्रवास करून २६ जून रोजी पुण्यात पोचतील. त्यानंतर २८ जून रोजी ते आळंदीला पोचणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी(२९ जून) रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. वारीत सहभागी होण्यासाठी मंगळवारी आळंदीला निघालेल्या मानाच्या अश्वांची बेळगावमधील शितोळे अंकलीमध्ये ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली.पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, शंकर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर गुळूंजकर, योगेश आरू, योगीराज कुऱ्हाडे, सत्यवान बवले, राहुल भोर आदी उपस्थित होते.
शितोळे अंकलीकर राजवाडा आणि नगरप्रदक्षिणा करून अश्व दुपारच्या विसाव्यासाठी मांजरीवाडी येथे पोहोचले. त्यानंतर मंगळवारी (दि. १८ जून) मिरज येथे मुक्कामी होते. बुधवारी(दि.१९ जून) मिरज- सांगलीमार्गे सांगलवाडीतील राममंदिरात मुक्कामी पोहोचले. आज गुरुवारी (दि. २० जून) तुंग, कारंदवाडी, मिरजवाडीमार्गे अश्व इस्लामपूर पेठनाका येथे मुक्काम असणार असून, शुक्रवारी (दि. २१ जून) पेठनाका, नेर्लेमार्गे वहागाव येथे अश्व येणार आहेत.शनिवारी (दि. २२ जून) वहागाव, उंब्रजमार्गे भरतगाव येथे, तर रविवारी (दि. २३ जून) सातारा, नागेवाडी, उडतरे, भुईंज मुक्कामी येणार आहेत. सोमवारी (दि. २४ जून) भूईंज, सुरूर खंडाळामार्गे सारोळा येथे; तर मंगळवारी (दि. २५ जून) अश्व शिंदेवाडी येथे येतील. बुधवारी (दि. २६ जून) अश्व पुण्यात दोन दिवसासाठी मुक्कामी येतील. शुक्रवारी (दि. २८ जून) येरवडा, थोरल्या पादुकमार्गे अश्व सायंकाळी आळंदीत येणार आहेत.