भोरमधील १३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, सरपंच पदाच्या १३ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात
भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यामधे सरपंच पदाच्या १३ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे कंसात मतदारांची संख्या – दापकेघर (३२०), शिरवली हिमा (७६४), हिर्डोशी (६०५), वडतुंबी (१२५०), वरोडी ब्रु. (५२८), पळसोशी (८०३), वरोडी खुर्द (७३३), नाटंबी (८९४), करंजे (७०६), महुडे खुर्द (१२१०), जयतपाड (७४९), कांबरे ब्रु (४३२) आणि माळेगाव (६६५).
उद्या होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून ४२ पथके, २१० शासकीय अधिकारी अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
भोर तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी गावावर हुकूमत गाजवण्यासाठी प्रत्येक गावात आपली ताकद पणाला लावली आहे. सरपंच थेट जनतेतुन निवडला जाणार असल्याने राजकीय गट या निवडणुका प्रतिष्ठा पणाला लावून लढताने दिसत आहेत. ही निवडणुक प्रत्यक्षात पक्ष चिन्हावर लढविली जाणार नसली तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच सत्ता यावी, आपल्या विचाराचे उमेदवार असावेत यासाठी प्रयन्तशील आहेत त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण असतात. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे, त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ऐन थंडीत भोर तालुक्यातील राजकारण अधिकच तापलेले असून गावा गावात उद्याच्या मतदानाची चर्चा सुरू आहे.