घरांचा ताबा गिरणी कामगारांना लवकरच मिळणार
मुंबई : म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या पात्र गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्न केले जात असून, आतापर्यंत १५ हजार ८७० गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. लवकरच गिरणी कामगारांना प्रत्यक्ष घरांचा ताबा देण्यास सुरुवात होणार असून, मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या ७ गिरण्यांच्या जमिनीवर सुमारे ५९४ गिरणी कामगारांसाठीची घरे तर सुमारे २९५ संक्रमण शिबिरसाठीची घरे बांधली जाणार आहेत.
बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार मुंबईतील ५८ गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना आखली आहे. त्यानुसार मुंबईतील कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक क्षेत्र प्रत्येकी एक तृतीयांश प्रमाणे महापालिका, म्हाडा आणि मालक यांना देण्याची तरतूद आहे. म्हाडाचा वाटा निश्चित झालेल्या ३७ गिरण्यांपैकी ३३ गिरण्यांचा १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडास मिळाला आहे. त्यापैकी २६ गिरण्यांच्या जमिनीवर ३ टप्प्यांमध्ये १३,६३६ गिरणी कामगारांसाठीची घरे व ६,४०९ संक्रमण शिबिरसाठीच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
म्हाडाने पुरविलेले mill worker eligibility ॲप मोबाइलवर डाऊनलोड करता येते. अँड्रॉइड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोरमध्ये तो उपलब्ध आहे. त्यावरून गिरणी कामगार, वारस अर्जदार कधीही, कुठूनही आपले अर्ज अपलोड करू शकतात.