धनकवडी येथे आगीत अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका
पुणे : हिल पॉइंट सोसायटी, श्रीधर नगर, धनकवडी येथील तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शनिवारी(दि.२८) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घरात अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच कात्रज आणि जनता अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या.
घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहिलं की पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली आहे आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला आहे. त्याचवेळी धुरामुळे एका खोलीत एक महिला अडकल्याने जवानांनी तातडीने बीए सेट परिधान करून खोलीत प्रवेश करून महिलेची सुखरूप सुटका केली, तर इतर जवानांनी सुमारे पंधरा मिनिटांत आग पूर्णपणे विझवली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र आगीत घराचे नुकसान झाले असून घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.
अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव,विशाल बोबडे, ऋषी बिबवे,वसंत भिलारे, संजय जाधव,किरण पाटील, महेश गारगोटे, अजित लांडगे,निरंजन गायकवाड, संकेत शेलार, विनय निकम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.