खेडशिवापुरला सोनारास लुटले, साडे सहा लाखाचा ऐवज लंपास
खेड शिवापूर : रविवार (दि.५ नोव्हेंबर) रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान यशवंत महामुनी(वय ४६ वर्षे,सोनार, रा.शिवापूर) ही व्यक्ती शिवापूर वाडा(ता.हवेली जि. पुणे) बस स्टॉप रोड येथून मोटारसायकल वरून जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून एक पल्सर कंपनीची मोटार सायकल आली. त्यावर ३ मुले स्वार होती.अनोळखी तीन मुलांनी महामुनी यांना अडवुन त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून मोटार सायकलला लटकवलेली सोने आणि चांदीचे दागिने असलेली पिशवी जबरदस्ती करून चोरून नेली. पिशवी मध्ये एकुण ८७ ग्रॅम सोने व ३ किलो चांदीचे दागिने होते. त्याची एकूण किंमत सुमारे ६,५८,००० रुपये एवढी आहे.या अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांची धांदल उडाली. त्यांनी राजगड पोलीस स्टेशन कडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रविवारी रात्री २ वाजता पोलीस अंमलदार इंगळे यांनी फिर्यादी यांच्या सांगण्यावरून अज्ञात तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास राजगड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन खामगळ करीत आहेत.