वाईत धोम धरणाच्या कालव्याला भगदाड, दीडशे ऊस तोड कामगारांना पुरातून बाहेर काढण्यात यश; संसार मात्र उघड्यावर
वाई : साताऱ्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे येथे रात्री ३ वाजता मोठी घटना घडली आहे. ओझर्डे गावातील ओढ्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. यानंतर जवळपास दीडशे ऊस तोड कामगारांना पुरातून बाहेर काढण्यात यश आले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, कालव्यातील पाणी शेतीचे नुकसान करत थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले.
तूर्तास या घटनेत कोणतीही जिवित हानी समोर आली नाही. तरीही अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. पूराच्या पाण्यात दोन बैल वाहून गेल्याचेही वृत्त आहे. धोम डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने या गावातील ओढ्याला मोठा पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात अनेक ऊस तोड कामगार अडकले होते. मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
असे असले तरी या ऊस तोड कामगारांचे सर्व साहित्य, अन्नधान्य, पैसे आणि काही बैलगाड्या, २ बैल वाहून गेले आहेत.या ऊस तोड कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने ऊस तोड मजूरांना सुरक्षित स्थळी हलवले असून सुदैवाने याठिकाणी कोणतीही जीवित हानी झालेली नाही.