खेड-शिवापूर पोलीस चौकीत घुसून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या फरार आरोपीला राजगड पोलिसांनी केले स्वारगेट येथे जेरबंद
पुणे : राजगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या खेड-शिवापूर पोलीस चौकीत घुसून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपीला राजगड पोलिसांनी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलटेकडी येथे बेड्या ठोकल्या आहेत. रोहन गौतम साळवे (वय २४ वर्ष, रा. कल्याण ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रविवारी(दि. १२ मे) रात्री ८ च्या सुमारास पोलिस हवलदार राहुल कोल्हे हे राजगड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलीस चौकीत कायदेशिर कर्तव्य बजावत असताना आरोपी रोहन साळवे याने चौकीत घुसून कोल्हे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत चौकीतील संगणक व इतर मालमत्तेची तोड-फोड करून फरार झाला होता. यानंतर राजगड पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवत तपास सुरू केला. तपासा दरम्यान राजगड पोलिसांना आरोपी रोहन साळवे हा स्वारगेट पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गुलटेकडी परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यांनतर लगेचच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अजित माने, भगीरथ घुले, महेश खरात यांचे पथक स्वारगेटच्या दिशेने रवाना झाले.
त्यांनतर स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अनिस शेख व रमेश चव्हाण यांच्या मदतीने राजगड पोलिसांनी गुलटेकडी परिसरात शोध घेऊन रोहन साळवे याला आज मंगळवारी(दि. १४ मे) ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीला पुढील तपासासाठी राजगड पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. ही कामगिरी स्वारगेट पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस अंमलदार अनिस शेख, रमेश चव्हाण तसेच राजगड पोलीस ठाण्याचे अजित माने, भगीरथ घुले, महेश खरात यांनी केली आहे.