आश्चर्यजनक! पुणे जिल्ह्याच्या चार लोकसभा मतदार संघातील १३८ उमेदवारांमध्ये अवघ्या दहा महिला; सुशिक्षित पुणेही महिला खासदारांच्या बाबतीत उणेच
पुणे : देशाच्या लोकसंख्येत म्हणजे मतदारांत निम्म्या महिला असल्या, तरी त्या तुलनेत महिला खासदारांचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण तेवढ्या प्रमाणात त्या निवडणुकीला उभ्या राहत नाहीत. कारण मुख्य राजकीय पक्ष त्यांना उमेदवारीच देत नाही. दुसरीकडे त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या, तरी निवडून येत नाहीत. अशा दुष्टचक्रात महिलावर्ग अ़़डकून पडला असल्याचे दिसून येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही महिला उमेदवारांची संख्या नगण्यच आहे. पुणे जिल्ह्याचे उदाहरण घ्यायचे झाले, तर जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यामध्ये १३८ उमेदवार रिंगणात असून त्यात फक्त दहा महिला आहेत. म्हणजे हे प्रमाण दहा टक्केही नाही.
शिरूर आणि मावळमध्ये महिला खासदारकीची पाटी यावेळीही कोरी?
आतापर्यंत शिरुर आणि मावळमध्ये कोरी राहिलेली महिला खासदारकीची पाटी यावेळीही तशीच राहणार आहे. कारण तिन्ही ठिकाणी जिंकून येऊ शकणारे मोठ्या राष्ट्रीय राजकीय पक्षांचे उमेदवार पुरुषच आहेत. त्यात मावळ आणि शिरुरमध्ये फक्त एकेकच महिला उमेदवार आहेत. आणि विशेष म्हणजे महिला उमेदवार या अपक्ष असल्याने त्यांची विजयी होण्याची शक्यता पूर्णपणे कमी आहे.
सुशिक्षित पुणेही महिला खासदारांच्या बाबतीत उणेच
पुणे लोकसभा मतदार संघात यावेळी सुद्धा महिला खासदार होणारच नाही. कारण ३५ उमेदवारांत फक्त तीन महिला असून त्या अपक्षच आहेत. त्यामुळे त्या विजयी होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे सुशिक्षित पुणेही महिला खासदारांच्या बाबतीत उणेच राहणार आहे.
बारामतीत, मात्र पुन्हा महिला खासदार होणार
बारामती लोकसभा मतदार संघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे प्रमुख दोन्ही उमेदवार (आघाडी आणि महायुतीच्या) या महिला आहेत. त्यामुळे बारामतीत, मात्र पुन्हा महिला खासदार होणार हे नक्की.