पुरंदर तालुक्यातील हातभट्टीवर जेजुरी पोलिसांचा छापा; तब्बल साडेपाच लाखांचे १० हजार लिटर कच्चे रसायन नष्ट
जेजुरी : ढोलेवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील नाझरे धरणाचे कडेला शेतात विहीरीजवळ आडोशाला गावठी हातभट्टीची दारु अड्ड्यावर जेजुरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख २४ हजार रुपयांचे १० हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष राठोड याच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ४ मार्च) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, ढोलेवाडी गावचे हद्दीत संतोष राठोड हा नाझरे धरणाचे कडेला शेतात विहीरीजवळ आडोशाला गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टी तयार करत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे जेजुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, तिथे गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १० हजार लिटर कच्चे रसायन, ३५ लिटरचे निळे रंगाचे प्लास्टिकचे ३५ कॅन्ड, त्यामध्ये १ हजार २२५ लीटर तयार गावठी हातभट्टी दारु, असा मुद्देमाल मिळून आला. कच्चे रसायन व जळके रसायन, लाकडी सरपण साहीत्य असे ५ लाख २४ हजार रुपयांचे १० हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले. परंतु हातभट्टी चालक संतोष राठोड हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.