पुसेगाव, औंध परिसरात मुसळधार पाऊस; तासभर झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला
सातारा : पुसेगाव परिसरात दमदार पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी वर्ग सुखावला. गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. सुमारे एक तास पडणाऱ्या मुसळधार पावसाने परिसरामध्ये पाणीपाणी केले असून, रब्बी पिकाला जीवदान देणारा हा पाऊस असल्याने पुसेगाव परिसरात शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. खरीप पिकानंतर आता रब्बी पिकाला पावसाची गरज होती. खरीप पिक पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे हातात आलेले केवळ पावसाच्या कमतरतेमुळे उत्पन्नात मोठी घट झाली होती. येणारा रब्बी हंगाम शेतकऱ्यांनी पावसावर बेभरवशी पद्धतीने पेरण्या केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा, बटाटा ही मुख्यत्वे पिके येतात. खरीप पिके ही नगदी पैशाची पिके असून, रब्बी पिकावर माणसाचे वर्षाचे वर्षभराचे अन्नधान्याचे साधन असते. या रब्बी पिकावर शेतकऱ्याचे व सर्वसामान्य लोकांचे जीवनमान अवलंबून असते.
रब्बी हंगामात हा पहिलाच दमदार पाऊस पडल्याने रब्बी पिकास फार उपयुक्त आहे. यासारखे अजून दोन-चार पाऊस पडल्यास, रब्बी पीक हाती लागून बऱ्याच अंशी अनेक प्रश्न सुटण्यास मार्गी लागणार आहेत, त्यामध्ये जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, याच रब्बी पिकावर व इथून पुढे पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. आज पडलेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व सुखावह वातावरण निर्माण झाले आहे.
औंध परिसरामध्ये औंध, गोपुज, पळशी, खरशिंगे, गोसाव्याची वाडी, खबालवाडी, नांदोशी तर पुसेगाव परिसरातील पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये सुमारे एक तास मुसळधार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता.