क्रूर वाल्ह्या कोळी ते रामायण रचनाकार आदिकवी महर्षी वाल्मिकीऋषी यांचा अद्भुत जीवन प्रवास, वाचा सविस्तर
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेले वाल्हे(ता.पुरंदर) गाव हे अति प्राचीन गावांपैकी एक मानले जाते. अशा या वाल्हे गावाला धार्मिकरित्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण वाल्मिऋषींनी एक तप राम नामाचा जप केल्यानंतर रामायण हा ग्रंथ लिहिला, अशी आख्यायिका आहे. महर्षी वाल्मिकींच्या जन्माबाबत अनेक पौराणिक कथा ऐकावयास मिळतात. त्रेता युगात वाल्मिकीऋषींचा जन्म झाल्याचे मानले जाते. जवळजवळ द्वापारी युगातील दानशूर वीर कर्ण याच्या जन्माशी साधर्म्य असलेली घटना वाल्मिकीऋषींच्या जन्माबाबत सांगितली जाते.
वाल्मीकी हा त्यांच्या आईला सूर्याच्या कृपेने झालेला मुलगा होता व त्यामुळे त्याच्या आईने त्यास नदीत सोडून दिले होते. ते बालक प्रवाहासोबत वाहत जाऊन एका कोळ्याला सापडले होते. त्या कोळ्यांनीच या बालकाचे नाव वाल्मीकी असे ठेवले होते, असे सांगतात. उदरनिर्वाहासाठी तो करत असलेल्या वाटमाऱ्यामुळे दरोडेखोर वाल्ह्या कोळी म्हणून कुप्रसिद्ध होता.
वाल्हे गावच्या परिसरात कोळविहिरे ते वाल्हे या परिसरात त्याचा वावर असल्याचेही बोलले जाते. कारण, लूटमार केल्यानंतर तो ज्या रांजणांमध्ये खडा टाकायचा, तो सात रांजण डोंगर वाल्हे गावाच्या पूर्वेला साधारणत: एक ते दोन किलोमीटर अंतराच्या डोंगरावर असून, त्या डोंगरावरील सात रांजणांचे प्रतीक मानल्या गेलेल्या दगडीपैकी चार ते पाच अजूनही दिसतात. बाकीचे काळाच्या ओघात कोसळले आहेत.
वाल्मिकी ऋषींच्या या सात रांजण डोंगराप्रमाणेच वाल्हे कोळ्याचा विहिरीचे देखील आख्यायिका सांगितली जाते. जंगलात फिरत असताना वाल्या कोळी ज्या ठिकाणी पाणी पिण्यास जायचा, ती विहीर कोळविहिरे गावच्या हद्दीत होती. वाल्ह्या कोळ्याच्या विहिरीच्या नावावरूनच गावाला कोळविहिरे; तर वाल्हे येथे त्यांनी समाधी घेतल्यामुळे वाल्हे गावाचा समाधीचे गाव म्हणून सुरवातीला वाला, नंतर वाल्हा व आता वाल्हे म्हणून गाव ओळखले जाते.
रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीत संबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याला विचारले, ‘अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस’? त्यावर वाल्याने, ‘माझ्या बायको-पोरांसाठी’ असे उत्तर दिले. त्यावर नारदमुनी त्याला म्हणतात, ‘जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय’?
‘तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो’ असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. ‘बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही? आता असा विचार करा! शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार?
पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, ‘नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!’ असे सडेतोडपणे सांगितले आणि नंतर तीच घटना वाल्या कोळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.
अशा या क्रूर व मदांध वाल्ह्या कोळ्यास पुढे नारदांनी उपदेश दिला व रामायण लिहिण्यास सांगितले. नारदांच्या उपदेशानंतर त्याने पश्चात्ताप करत आपला हातातील कुऱ्हाड तिथेच जमिनीवर रोवून सलग बारा वर्षे तपचर्या केली. पुढे या वाल्ह्याचाच वाल्मीकी व महर्षी वाल्मिकीऋषी झाल्याची आख्यायिका आहे. पुढे त्यांनी सात कांड रामायण हा ग्रंथ लिहिला व त्यानंतर कित्येक वर्षांनी प्रभू श्रीरामचंद्र जन्मास आले व महर्षी वाल्मिकींनी वर्णन केल्याप्रमाणे रामायण घडले.
जेजुरीला गेलात तर जरा वाट वाकडी करून वाल्हे(ता.पुरंदर) येथील महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मंदिराला अवश्य भेट द्या. या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात वाल्या, महर्षी वाल्मिकी ऋषी ते रामायण अशी सगळी कथा पेंटिंगच्या रुपात भिंतीवर फ्रेमच्या माध्यमातून बघायला मिळते. या पेंटिंग इतक्या अप्रतिम आणि जिवंत वाटतात की तो प्रसंग प्रत्यक्षात समोर उभा आहे असे जाणवते. विशेषतः लहान मुलांना हे या पेंटिंग आणि कथा प्रत्यक्ष दाखल्यास आपसूकचं एक संस्कार त्यांच्यावर होईल आणि आपली संस्कृती आपला इतिहास पुढच्या पिढीत जाईल. संधी प्रत्येकाला मिळतेचं आणि ती संधी योग्य वेळी ओळखून, त्या संधीचा यथायोग्य प्रकारे वापर करून आपलं आयुष्य हे शून्यातून देवत्वापर्यंत कसे नेऊ शकतो याचं हे मूर्तिमंत आदर्श प्रतीक म्हणजे आदिकवी महर्षी वाल्मिकीऋषी आहेत.