अभिमानास्पद ! मुळशीच्या सानिया कंधारेची बांगलादेश मध्ये सुवर्ण भरारी
पुणे : बांगलादेशला झालेल्या साऊथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेत कोंढावळे (ता. मुळशी) येथील सानिया पप्पू कंधारे हिने दुहेरी सुवर्णपदकाला गवसणी घातली.
५४ किलो गटात स्पोर्टस सॅम्बो आणि कोम्बेट सॅम्बो या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचा तिरंगा बांगलादेशात फडकवला. तसेच मुळशीचा डंकाही आशिया खंडात वाजविला.
सानिया कदमवाकवस्ती येथे महाराष्ट्र राज्य सॅम्बो असोसिएशनचे सचिव कुमार उघडे यांच्याकडे सराव करते. जोपर्यंत देशाला सुवर्णपदक मिळवून देणार नाही तोपर्यंत डोक्यावर केस वाढू देणार नाही असा तिने शाळेत असताना मनाशी निर्धार केला होता. सातत्याने मेहनत करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली. त्यामुळे बांगलादेश येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.
सानिया महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. येथील क्रीडा शिक्षिका मंगला शेंडे, कबड्डी प्रशिक्षक भरत शिळीमकर यांनीही तिला प्रोत्साहन दिले. तिने देशासाठी दोन सुवर्णपदके मिळवून मुळशीचे नाव देशाबरोबरच आशिया खंडात चमकविले. तिच्या या यशाबद्दल तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.