सराईत रिक्षाचोर सिंहगड पोलिसांच्या जाळ्यात; चोरीच्या तीन रिक्षा जप्त
पुणे : सिंहगड रोड परिसरात रिक्षा चोरणाऱ्या एका सराईताला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या तीन रिक्षा जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशाल युवराज राऊत (वय १९, रा. मु.पो. अंतोली ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गेल्या महिन्यात (दि. २८ डिसेंबर) वडगाव बुद्रुक येथील केदार अपार्टमेंटमध्ये पार्किंग केलेली ऑटोरिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तपास पथक करीत होते. तेव्हा पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. दाखल गुन्ह्याचा तपासात पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, एक तरुण प्रयोजा सिटी समोरील सर्व्हिस रोडवर काळी-पिवळी रिक्षा घेऊन त्यामध्ये बसला आहे. ही रिक्षा चोरीची असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी लागलीच ही माहिती वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांना कळवून पथकाने घटनास्थळ गाठले. तसेच, संशयिताला रिक्षा घेऊन जाण्याच्या तयारी असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत चौकशी केली. मात्र, त्याने काहीच माहिती दिली नाही. रिक्षा चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली व ती रिक्षा जप्त केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कात्रज चौक, सर्प उद्यान कात्रज येथून रिक्षा चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आणत पथकाने २ लाख ५५ हजार रुपयांच्या तीन रिक्षा जप्त केल्या आहेत. सिंहगड रोडमधील एक आणि भारती विद्यापीठ भागातील दोन असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे,अमोल पाटील, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील,स्वप्नील मगर यांच्या पथकाने केली.