जेजुरीत देवसंस्थानकडून सोमवती यात्रेची जय्यत तयारी तसेच जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतुक व्यवस्थेत बदल
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा सोमवती यात्रा पालखी सोहळा सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी होत आहे. सकाळी ७ वाजता देवाची पालखी गडावरून कऱ्हा नदीकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर दुपारी १२ ते १ च्या दरम्यान नदीवर देवाला कऱ्हा स्नान घालण्यात येणार असल्याचे देवाचे इनामदार व मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी ८ यात्रा भरतात. सोमवारी अमावस्येला सोमवती यात्रा भरते. या सोमवती यात्रेला धार्मिक महत्त्व आहे.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणेकडे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद केली जाणार आहे. संबंधित वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्गाने पुणेच्या मार्गाने वळविण्यात येणार आहे. पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर- कोथळे - नाझरे - सुपे -मोरगाव रोड मार्ग बारामती मार्गे वळविण्यात येत आहे. वाहतुकीस लावलेले निर्बंध 13 नोव्हेंबर रोजीच्या 'श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेसाठी येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील.
-पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे(जेजुरी पोलीस स्टेशन)
या यात्रेसाठी सुमारे ४ ते ५ लाख भाविक येत असतात. या यात्रेच्या नियोजनासाठी श्रीखंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी व ग्रामस्थांची बैठक ऐतिहासिक छत्री मंदिर परिसरात पार पडली. या वेळी पेशवे बोलत होते. या वेळी तहसीलदार व देवसंस्थानचे पदसिद्ध विश्वस्त विक्रम रजपूत, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, श्रीखंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिन पेशवे, रोहिदास माळवदकर, संतोष खोमणे, कृष्णा कुदळे, अरुण खोमणे, छबन कुदळे, पंडित हरपळे, माणिक पवार आदी उपस्थित होते.