भोर येथील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती, तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मात्र फिरवली पाठ.
थोपटे पिता-पुत्रांचीही घेतली भेट; राजकीय चर्चेला मात्र उधान
भोर : खासदार सुप्रिया सुळे या आज शुक्रवारी (दि.५ जानेवारी) सकाळी विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सायकल वाटपाच्या कार्यक्रमाला आणि शहरातील व्यापा-यांसमवेत बैठकीसाठी भोरला उपस्थित राहिल्या होत्या.
उपमुख्यमंञी अजित पवार यांनी महायुती सरकार मध्ये सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे. यामुळे आयोजित कार्यक्रमात भोर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी आमदार संग्राम थोपटे व माजी मंञी अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे आज त्यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला चांगलेच ऊधान आले आहे. सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेत लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात बातचीत झाली असल्याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.
मागील पाच वर्षात आमदार संग्राम थोपटे व खासदार सुप्रिया सुळे कधीही कोणत्या कार्यक्रमात एकत्र आले नाहीत. उलट एकमेकांवर टिका करून एका विकासकामाचे दोघांनी वेगवेगळे भूमीपूजनही केलेले आहे. आता त्यांना काँग्रेस शिवाय पर्याय उरलेला नसल्य़ामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार थोपटे यांची भेट घेतली असल्याची चर्चा मात्र भोर तालुक्यात रंगली आहे.