‘ऑपरेशन मुस्कान १२’ला पुण्यातून होणार प्रारंभ
पुणे: राज्यभरात राबविल्या जाणार्या ‘ऑपरेशन मुस्कान’चा पुण्यात प्रारंभ करण्यात आला असून, पुणे पोलिसांकडून अपहृत बालके व महिला यांचा शोध घेण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक सुरक्षा विभाग तसेच स्थानिक पोलिसांकडून मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘ऑपरेशन मुस्कान’ ही हरवलेल्या मुलाना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी राबवली जाणारी एक मोहीम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जाते. त्यानुसार यंदा १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ‘ऑपरेशन मुस्कान १२’ राज्यात राबविले जाणार आहे. पुणे पोलिसांकडून देखील यासाठी पथक तयार करण्यात आले असून, १८ वर्षांखालील अपहृत बालके तसेच १८ वर्षांवरील महिला यांचा शोध घेण्यात येणार आहे. युद्धपातळीवर ही मोहीम राबविली जाणार आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक स्थानिक पोलिस ठाण्यातील पथकदेखील या मोहिमेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त अपहृत बालके, महिला शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.