पुण्यात सुमारे २२ हजार नवी वाहने रस्त्यावर; इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती
पुणे: दिवाळीत शहरातील रस्त्यांवर सुमारे २२ हजार नवीन वाहनांची भर पडली. यात पुणेकरांनी पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना सर्वाधिक पसंती दिली आहे तर इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला आहे. २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान पुण्यात एकूण २१ हजार ७८५ वाहनांच्या विक्रीची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार ३२ वाहनांची वाढ झाली आहे.
दिवाळीत नागरिक नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. वाहनांचे बुकिंग जरी केले असले, तरीही अनेकजण डिलिव्हरी दिवाळीच्या मुहूर्तावरच घेतात. यंदा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या हद्दीतून एकूण २० हजार ८३ वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे. पाऊसपाणी समाधानकारक झाला तर त्याचा फायदा ऑटोमोबाइल क्षेत्राला होत असतो, यंदा मात्र तुलनेत पाऊस कमी असला तरी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.
१०० आणि ११० सीसीच्या वाहन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे, तर दुसरीकडे एसयूव्ही कारला अधिक प्राधान्य दिले जात आहे. मात्र किमान दीड ते दोन महिने कारसाठी वेटिंग असल्याने, मुहूर्तावर वाहन उपलब्ध करून देण्याचे आव्हान वाहन विक्रेत्यांसमोर आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रीक वाहनांची विक्री घटल्याची नोंद आरटीओ कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर २०२२ ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १ हजार ९२९ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. यंदा २४ ऑक्टोबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १ हजार ७०२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असल्याने, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २२७ इलेक्ट्रिक वाहने कमी विकली गेली आहेत.