लाचखोर वाघ अखेर पोलिसांच्या पिंजऱ्यात
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : गेल्या १२ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा लाचखोर वाघ पोलिसांच्या पिंजऱ्यात अडकलाय. लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक केलीय
मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना पथकाने त्याला अटक केली. वाघ याला पाच दिवासांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शासकीय ठेकेदाराचे अडीच कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी लागणाऱ्या स्वाक्षरीसाठी गणेश वाघने तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने काम केलं होतं. गणेश वाघ हा नगरच्या कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत होता. त्यावेळी ठेकेदाराने पाईपलाईनचं काम केलं होतं.
त्या कामाच्या बिलावर गणेश वाघ याची स्वाक्षरी गरजेची होती. परंतु गणेश वाघ याची धुळे येथे बढतीवर बदली झाली होती. ठेकेदाराला कामाच्या उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी गणेश वाघ याची बिलावर स्वाक्षरी हवी होती. या स्वाक्षरीसाठी गणेश वाघने १ कोटी रुपयांची लाच ठेकेदाराकडे मागितली होती. ही लाच नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितले होते.
दरम्यान लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अमित गायकवाडला लाचेची रक्कम स्वीकारता अटक केली. परंतु या प्रकरणामागे गणेश वाघ असल्याचं लाचलुचपत विभागाच्या तपासात समोर आलं. परंतु तीन नोव्हेंबरपासून वाघ पसार झाला होता. तब्बल १२ दिवसांपासून गणेश वाघ पोलिसांना गुंगारा देत होता.
वाघला पकडण्यासाठी लाचलुचपत पथकाच्या नाशिक पथकानं संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं. तरीदेखील त्याचा पत्ता लागला नव्हता. यात वाघचे नातेवाईक सुद्धादेखील बेपत्ता झाले आहेत. दरम्यान गणेश वाघ बाहेर देशात पळून जाऊ नये, यासाठी लाचलुचपत विभागाने लूक आऊट नोटीस बजावली होती.