शिरवळ येथील इमारतीला आग, दर्ग्यातील सेवेकरींच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
शिरवळ : शिरवळ(ता. खंडाळा, जि. सातारा) येथील हजरत कमानपीर दर्गाहजवळील इमारतीला मंगळवारी (दि.१४ नोव्हेंबर) मध्यरात्री आग लागली. दर्ग्यातील सेवेकरींनी आग विझवण्यासाठी शर्थीचे मोठे प्रयत्न केले, या सेवेकरींनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, या आगी मुळे बहुतेक मालमत्तेचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आगीत इमारतीत असलेले टेलरिंग दुकान संपूर्ण जळून खाक झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिरवळ ग्रामपंचायत सदस्य ॲड. आनंद फडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्यांचे सहकारी व दर्ग्यातील सेवेकरी यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. संपूर्ण आग विझवल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक बंब दाखल झाला. यामुळे शिरवळ गावात अशा घटनांसाठी एक अग्निशामक बंब तत्पर असावा अशी शिरवळ ग्रामपंचायत सदस्य ॲड.आनंद फडके यांनी मासिक सभेमध्ये याविषयी मागणी करणार असल्याचे सांगितले.