वंचिताच्या कोपीवरी,दिवाळी फराळाची शिदोरी
सारोळा : नवज्योत परिवार ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ऊसतोड मजुरांच्या सोबत न्हावी, ता.भोर,जि.पुणे येथील स्थलांतरित ऊसतोड कामगार ५० कुटुंबियांना दिवाळी फराळ,कपडे वाटप,लहान मुलांना खेळणी,प्रत्येकाला आकाश कंदील, जि प प्राथ.शाळेसाठी साहित्य-पृथ्वी गोल, पडदे, बस्कर पट्या व इतर उपलब्ध साहित्य ऊसाच्या फडात जाऊन वाटप करण्यात आले
ऊसतोड बांधव ऐन दसरा- दिवाळीच्या दरम्यान घरदार सोडून ऊसतोड मजुरीसाठी येतात. रोजच्या जगण्याच्या लढाईत कोयत्याने सपासप ऊस तोडून उदरनिर्वाह करतात.मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते त्यामुळे मुले शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात.आजोबा,पंजोबापासून पिढ्यानंपिढ्या ऊसतोडणीसाठी सज्ज असतात.त्यावेळी दिवाळीचा फराळ बनवायला वेळ कुठे मिळतो,शिवाय तशी आर्थिक परिस्थिती सुद्धा नसते. हीच भावना लक्षात घेऊन नवज्योत परिवार ट्रस्टने ५० कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी गोड केली.याचे परिसरात कौतुक होत आहे.
यावेळी स्थलांतरित ऊसतोड कामगार व त्यांच्या सोबत आलेल्या ६ ते १४ वयोगटातील मुलांचे शैक्षणिक दृष्टया उद्भबोधन बालरक्षक चळवळीतील शाळाबाह्य मुलांचा वाटसखा अनिल चाचर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष संजय लगाडे, नितीन वांजळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शीतल लगाडे,संचालक दत्तात्रय चव्हाण, नागेश नलावडे,शैलेश जगताप टोळीमालक,शरद सोनवणे,प्रमोद सोनवणे, रुपाली चाचर आदी मान्यवर व मोठया संख्येने ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चाचर यांनी केले तर आभार रुपाली चाचर यांनी मानले.