पुणे जिल्ह्यातील १४६ किमी पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; भोर तालुक्यातील ९ किमी पाणंद रस्ते मोकळे
भोर : सरकारच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सुमारे १४६ किलोमीटरच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याकामी पुढाकार घेत सर्व तहसीलदार आणि तलाठ्यांना पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ब्रिटिशकाळात पारंपरिक वहिवाटीचे रस्ते नकाशावर नव्हते. ते रस्ते आता नकाशावर आणण्यात आले आहे. यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात अवजारे घेऊन जाणे, शेतीमालाची वाहतूक करणे सोपे झाले आहे.
पूर्वी पारंपरिक वादांमुळे शेतकरी एकमेकांना रस्ते देत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कुचंबणा होत होती. मात्र आता प्रत्येक शेताला आणि शेतकऱ्यांना रस्ता देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यानुसार पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी (कुळकायदा) नामदेव टिळेकर यांनी देखील पाणंद रस्ते मुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.
रस्त्यांचे पारंपरिक वाद, तक्रारी प्रलंबित होत्या या तक्रारी निवारणांसाठीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण जिल्हाधिकारी डुडी यांनी करत, तहसीलदारांचे अधिकार नायब तहसीलदारांना दिले. यामुळे वाद मिटविण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात काही दिवसांतच सुमारे १४६ किलोमीटर रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
पुणे जिल्ह्यात मोकळे झालेले पाणंद रस्ते :
तालुक्याचे नाव – रस्त्यांची संख्या – रस्ता लांबी (किमी)
भोर – ८ – ९
राजगड(वेल्हे) – ३ – ३.८
आंबेगाव – ४ – ४.४३
खेड – १२ – २१
जुन्नर – ८ – ८
दौंड – ५ – ५.८
बारामती – १० – ६.३
मावळ – १४ – २३.८
मुळशी – ८ – ८
शिरूर – १५ – ३७
लोणी काळभोर – ६ – ३
हवेली – ३ – ३