फलटण येथे कमिन्स कंपनीच्या मैदानात बेकायदा बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल
फलटण : जनावरांच्या लम्पी संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही फलटण ग्रामीण पोलीस हद्दीतील सुरवडी गावच्या हद्दीत दिनांक १७ नोव्हेंबर रोजी बेकायदा बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी १५ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरवडी गावाच्या हद्दीत फलटण लोणंद रोडवरील कमिन्स कंपनीच्या पश्चिमेकडील मोकळ्या जागेत दि. १७ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बैलगाडा शर्यत भरवत शर्यतीसाठी आवश्यक कोणतीच परवानगी न घेता व बैलांचा छळ होईल अशी कृती केल्याबद्दल पंधरा जणांविरुध्द पोलीस अंमलदार सुरज काकडे यांनी फिर्याद दाखल केली असून फलटण ग्रामीण पोलीसात पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुलगे, पोलीस अंमलदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सुरज काकडे, कुंभार व देशमुख यांनी भाग घेतला. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार व्ही. आर. सूर्यवंशी करत आहेत.