विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बार्टीचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण,निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शिक्रापूर येथील वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० फिरते दूचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खाजगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पुरेशा प्रमाणात औषधसाठादेखील ठेवण्यात आला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनींची काळजी घेण्यात आली असून एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत. हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिला यांना तसेच त्यांच्या समवेत असलेले लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनाकरीता खेळणी साहित्य व खाऊ ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ”द प्रॉब्लेम ऑफ रुपी” या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्यावतीने पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारले आहेत. बार्टी संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.
”द प्रॉब्लेम ऑफ रुपी, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बुद्ध आणि त्याचा धम्म आदी पुस्तके उपलब्ध असून अनुयायांनी बार्टीच्या दालनाला भेट देऊन या पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले आहे.