भोर च्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा एल्गार, मराठ्यांना आरक्षण मिळणारच, मराठे लवकरच गुलाल उधळणार

भोर: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, आज रविवार (दि.१९ नोव्हेंबर) रोजी भोर येथील शेटे मैदान येथे त्यांची विराट सभा पार पडली. या सभेला भोर मधील विविध संघटनांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत जो काही अन्याय होत आहे, तो लढा आता शंभर टक्के पूर्ण होणार आहे. ज्याप्रमाणे मराठे स्वराज्यात एकवटले होते, त्याचप्रमाणे आता सगळीकडे एकवटले आहेत. राज्यभरात आत्तापर्यंत आज मिळालेल्या माहितीनुसार २९ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण होते, परंतु ते जाणून बुजून मिळवून दिले नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, ७० वर्षे झाले मराठा समाज वाट बघतोय. हे भयाण वास्तव माय-बापात-मुलात संपूर्ण महाराष्ट्रात उभे राहिले आहे. मराठा समाजाला आरक्षण हे १०० टक्के मिळणार आहे. मराठा आरक्षण विरोधात बोलणाऱ्याला मी सोडत नाही मग तो कोणीही असो. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी ठरवलेय जाती जातीत दंगली झाल्या पाहिजेत. छगन भुजबळांना माझा कधी विरोध नव्हता.त्यांच्या विचारसरणी ला होता. पण आता त्यांना व्यक्ती म्हणूनही माझा आणि मराठा समाजाचा विरोध असेल.

Advertisement

मराठा समाजाला माझे एक सांगणे आहे, कोठेही जातीय तेढ निर्माण होऊन द्यायची नाही. ते काहीही बोलून भांडणे लावायचा प्रयत्न करतील. २४ डिसेंबर पर्यंत आपल्याला आरक्षण मिळेल. मग गल्ली पासून दिल्ली पर्यंत त्यांना बघायला आपल्याला वेळच आहे. सगळे ओबीसी बांधव आपल्या सोबत आहेत त्यामुळे एका व्यक्तीसाठी आपल्यात तेढ निर्माण होऊ देऊ नका.

मावळ खोऱ्याने आज  पुन्हा एकजूट दाखवली. याच मावळ खोऱ्याने मराठ्यांन विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. याच मावळ खोऱ्यातील सवंगड्यासह रायरेश्वरावर शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वाला स्वराज्य दिले. एकदा विषय हातात घेतला की हितले मावळे मागे हटत नाहीत. भोर मध्येही भरपूर कुणबी नोंदी आढळल्या असल्याचे समजले आहे. असे ते या वेळेस बोलले.

तसेच ते बोलले कि, सगळे जण मला खूप वेडा समजतात. त्यांचही बरोबर आहे मला कसाही मोजा मी ३५ किलोच भरतो. टप्प्यात येई पर्यंत मी शांत बसतो, टप्प्यात आला की वाजवतोच. सरकारचे एकही षडयंत्र मी यशस्वी होऊन देणार नाही. संपूर्ण मंत्री मंडळ माझ्या शेजारी बसून होते पण मी नियत ढळू दिली नाही. ज्या समाजाला मी माय बाप मानतो त्यांच्याशी कधीच गद्दारी करणार नाही. मराठे गुलाल उधळणारच .
मनोज जरांगे पाटील यांना भाषणानंतर सकल मराठा समाज भोर चे अध्यक्ष संजय भेलके यांच्या हस्ते वाघनखे भेट देण्यात आली. तसेच या सभेला भोर पोलीस स्टेशन व राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page